सारा न्यूज नेटवर्क -
शेअर मार्केटमधून नफ्याच्या आमिषाने महिलेची १७ लाखांची फसवणूक..
पुणे (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून अधिक नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची १७ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ४२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. महीलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विविध मोबाइल आणि बँक खातीधारक अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या विमाननगर येथे राहतात. अनोळखी आरोपीने महिलेशी ९ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन संपर्क साधला. आरोपीने त्यांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास सांगितले. तसेच शेअर बाजाराच्या माध्यमातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच एका ट्रेडिंग अँपवर भरघोस नफा मिळत असल्याचे भासवले. फिर्यादी महिलेने आरोपीने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी विविध बँक खात्यांवर सुमारे १७ लाख रुपये पाठवले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. विमानतळ पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी पुढील तपास करीत आहेत.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे



No comments:
Post a Comment