सारा न्यूज नेटवर्क -
शौकत पठाण यांची नाराजी उफाळली; जिल्हाध्यक्ष पदाच्या पत्रासाठी पक्षाकडे पुन्हा मागणी.
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार न दिल्याने काँग्रेसमधून एमआयएममध्ये गेलेले शौकत पठाण यांनी आता पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने चेतन नरोटे यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मुस्लिम नेत्यांपैकी शौकत पठाण एमआयएममध्ये दाखल झाले होते. त्यांच्या प्रवेशावेळी खुद्द प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाची घोषणा एका कार्यक्रमात केली होती.मात्र, या घोषणेनंतरही शौकत पठाण यांना अद्याप अधिकृत नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यांनी पक्षाकडे यासाठी वारंवार मागणी केली असतानाही केवळ चार ओळींचे पत्र देण्यात पक्ष एवढा मागे-पुढे का पाहतो, यावरून सोलापुरात चर्चांना उधाण आले आहे.या पार्श्वभूमीवर शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. कोणाचेही नाव न घेता, "एमआयएममध्येच राहणार आहे, मात्र काही दिवसांसाठी पक्षाचे कोणतेही काम करणार नाही. घरीच थांबणार," असे सांगून त्यांनी पक्षाकडे अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष पदाच्या घोषणेनंतरही अधिकृत पत्र न मिळाल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता, आता एमआयएम पक्ष यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment