सारा न्यूज नेटवर्क -
कल्याणमध्ये मराठी तरुणीला मारहाण, परप्रांतीय तरुणाला कोर्टाचा मोठा दणका,
गोकुळ झाचा न्यायालयातच गोंधळ..
कल्याण (प्रतिनिधी) :- सुनावणीच्या वेळी गोकुळ झा याने माझ्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला. माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असे विचारत त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला
कल्याण पूर्वेकडील डॉक्टरच्या क्लिनिकमधील मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
*गोकुळ झाचा कोर्टात गोंधळाचा*
सुनावणीच्या वेळी गोकुळ झा याने माझ्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला. माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असे विचारत त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.
गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत या दोघांनाही आज, बुधवारी दुपारी मानपाडा पोलिसांद्वारे कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
*काय आहे प्रकरण?*
कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टचं काम करणाऱ्या मराठी तरुणीला गोकुळ झा याने मारहाण केली. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चिघळलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर मनसे पदाधिकाऱ्यांनीच गोकुळला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं.
*नेमकं काय घडलं?*
डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले असल्यामुळे रुग्णांना काही काळ आत न पाठवण्याची सूचना रिसेप्शनिस्ट तरुणीला मिळाली होती. त्यामुळे तिने आरोपीसह इतर रुग्णांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले होते. मात्र, तरीही तो ऐकत नसल्याने तिने आरोपी गोकुळला आत जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिडलेल्या गोकुळने Kalyan Marathi Receptionist ला केसांना धरुन बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फूटेजही व्हायरल झाले.
*लूक बदलून गुंगारा*
पोलिसांनी गोकुळ झा याच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल केला, मात्र त्याला अटक झाली नव्हती. अखेर अंबरनाथमधील नेवाळी नाका येथे त्याला पकडत काही मनसे पदाधिकाऱ्यांनी गोकुळला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. नांदिवली भागात अनेक जण ओळखत असल्यामुळे गोकुळने वेश बदलून पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला, परंतु मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलें
*कोण आहे गोकुळ झा?*
गोकुळ झा सराईत गुन्हेगार असून चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती आहे. त्यानंतर मंगळवारी त्याने रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केली. त्याच्यावर यापूर्वी हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे यासारख्या काही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.
*शिवसेनेची पोलिसांना मागणीवर*
दरम्यान, मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे दोन्ही गट मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांची भेट घेण्याआधी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण-तरुणींना मारहाण होत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला पकडून दिल्याबद्दल मोरेंनी त्यांचे आभारही मानले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे


No comments:
Post a Comment